जि.आय.एस. तंत्रज्ञान आणि जमीन मोजणी

     आपल्यासमोर हा एक महत्वाचा विषय ठेवत आहे. ज्यांच्या मालकीची जमीन आहे, त्यांवर वहिवाट आहे, त्यांच्यासाठी. आपल्या जागेचे अद्ययावत नकाशे का बनवावेत? जि.आय.एस. तंत्रज्ञान म्हणजे नक्की काय? या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्य जागामालक करू शकतो का? या विषयी मार्गदर्शन करणारा हा एक मराठी प्रयत्न.

     नमस्कार मित्रांनो,

     माझं नाव अशिष कुरणे, मी जि.आय.एस. म्हणजेच ‘जिओग्राफिक इन्फोर्मेशन सिस्टिम’ या तंत्रज्ञानाशी निगडीत व्यवसाय चालवतो. हा व्यवसाय करत असताना अनेकांशी संपर्क आला आणि तेंव्हाच्या चर्चांदरम्यान अशी जाणीव झाली की आपल्याकडे जि.आय.एस तंत्रज्ञानाबद्दल जनजागृती आवश्यक आहे. विशेषतः निसर्गसंप्पन्न ग्रामीण भाग, जिथे वडिलोपार्जित जमीन व त्यावरील उत्पन्न हाच चरितार्थ चालवण्याचा मुख्य मार्ग असतो. त्याजोडीला नव्याने येऊ पाहत असलेले औद्योगिकीकरणाचे वारे. म्हणून हा लेखप्रपंच करीत आहे.

     आजकाल आपल्या कानावर जि.आय.एस. हा शब्द सतत येत असेल किंवा अनेकांना ह्याबद्दल माहितीही असेल. सध्या अनेक मुलभूत सरकारी योजनांमध्ये ह्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, विशेष करून आधुनिक विकास कामासाठी, शहर, नगर, अगदी गाव पातळीवर देखील या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसं जि.आय.एस. बद्दल थोडक्यात सांगणं सोप्पं नाही, कारण ही एक मोठी संकल्पना आहे, किंवा अनेक संकल्पनांचे एकत्रीकरण म्हणूयात. नावा प्रमाणेच म्हणजे जिओग्राफिक इन्फोर्मेशन सिस्टिम’चा अर्थ आपल्या मराठी भाषेत भौगोलिक माहिती प्रणाली असा होतो. आता भौगोलिक माहिती ही इतकी प्रचंड असते कि त्यामधे अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. उदाहरणार्थ नैसर्गिक आणि मानवनिर्मित गोष्टी जसे नद्या, नाले, डोंगर उतार, जंगलं, शेती, मानवी वस्त्या, गावं, शहरे, रस्ते, धरण, कालवे, मंदिर, शाळा, कॉलेज, कार्यालय, रेल्वे मार्ग, दळण-वळण, पाणी पुरवठा एक ना अनेक. सरकारी विकास कामांचे नियोजन करताना अशा अनेक गोष्टी एकच वेळेस समजून घ्याव्या लागतात. अशावेळेस विभिन्न गोष्टी एकाठिकाणी पहायच्या असतात, यांसाठी सर्वात सोप्पा उपाय म्हणजे त्यांचे भौगोलिक स्थान पाहणे. जेणेकरून ह्या सर्व एकमेकांशी निगडित गोष्टींचा परस्परसंबंध सुस्पष्ट होऊ शकतो. हेच काम भौगोलिक माहिती प्रणाली मार्फत केले जाते, जेथे ही सर्व माहिती आवश्यक संदर्भांसहित साठवली जाते आणि गरजेनुसार विविध पातळ्यांवर संकल्पित करून आवश्यकतेनुसार विविध कामांसाठी त्याचा वापर करता येतो. काही वर्षांपासून भारतामध्ये जवळपास सर्वच क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सरकारी आणि प्रशासकीय सेवांमध्येही आधुनिक तंत्रज्ञान विशेष स्वरूपात वापरले जाते. प्रादेशिक, सरकारी आणि खासगी संस्था देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरून आपल्या सेवांचा अचूक आणि काटेकोर पद्धतीने विस्तार करीत आहेत.. अशा सेवांपैकी भौगोलिक माहिती प्रणाली (Geographic Information System (GIS)) ही एक अत्याधुनिक सेवा म्हणून गणली जाते. सदर भौगोलिक माहिती प्रणाली वापरून जगातच नव्हे तर भारतात देखील अनेक उपक्रम राबवले जात आहेत. भौगोलिक माहितीचे संकलन योग्य अशा स्तरांमध्ये करून त्याचे विश्लेषण (प्रकल्पाच्या उद्दिष्टानुसार) करणे हा या प्रणालीचा गाभा आहे. उदाहरणार्थ प्रादेशिक, शहरी व ग्रामीण विकास आराखडा बनवणे (Development Plans), रस्ते व वाहतुकीचे जाळे विस्तारीकरण आणि व्यवस्थापन करणे, जलसिंचन योजना आखणे, शहरी पाणी पुरवठा व निस्सारण योजना, सुरक्षा उपाय योजना बनवणे, आपत्ती व्यवस्थापन योजना राबवणे, भौगोलिक माहिती जमवणे व जतन करणे, वीज पुरवठा योजना, जमीन सर्वेक्षण इत्यादी. सदर तंत्रज्ञानात संगणकीय प्रणाली व आधुनिक सर्वेक्षण यंत्र यांचा वापर केला जातो. त्यामध्ये उपग्रह छायाचित्रे, दूर-संवेदक प्रणाली (Remote Sensing), LiDAR, GPS, DGPS, ड्रोन, आदी तंत्रज्ञान वापरून मिळवलेली माहिती, संगणकीय प्रणालीचा वापर करून उपरोक्त उपक्रमाची उपयुक्तता तपासण्यास कित्येक पटीत मदतगार होते. असे तंत्रज्ञान केवळ सरकारी वा खासगी संस्थाच नव्हे तर नागरिकांना देखील खासगी वापराकरिता उपलब्ध आहे.

     आता एवढी माहिती सांगण्याचे कारण असे आहे कि त्याआधारित एक महत्वाची, गरजेची आणि उपयुक्त गोष्ट  आपल्याला माहिती असणे अत्यावश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती… माझ्याबरोबर, मी अशिष कुरणे आणि माझी प्रोप्रायटरी फर्म स्पाशिअन्स जिओ सोल्युशन्स सोबत...

 

     सर्वात आधी आपण हे पाहू की…

     प्रत्येक जमिनीसंदर्भातील महत्वाची कागदपत्रे म्हणजे आपल्याकडे असलेले सात बारा उतारा आणि गटबुक नकाशा. हे दोन्ही कागदपत्रे कोठेही अधिकृत व ग्राह्य धरले जातात आणि वेळोवेळी आद्ययावत केले जातात. अद्यायावत करणं थोडंसं वेळखाऊ काम असतं, पण सर्व सोपस्कार केल्यानंतर सगळं व्यवस्थितपणे होतं. असे नकाशे पुढे आपल्याला अनेक कामांसाठी उपयुक्त ठरतात.

     सध्या सगळीकडेच संगणकिकृत सातबारा आराखडे मिळत आहेत, तेही ऑनलाईन, अधिकृत सरकारी वेबसाईट वरून. सरकार वा शासना तर्फे नकाशे संगणकीकृत कारण्याचे काम सुद्धा चालू आहे. तशी माहिती वेळोवेळी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेत स्थळावर पाहण्यास उपलब्ध असते. तसेच अनेक सरकारी योजना आता संगणकिकृत झाल्या आहेत, असं वर्तमानपत्र व अन्य माध्यमातून अधून-मधून ऐकायला मिळतं. नकाशे संगणकीकृत करणं तसं सोप्पं काम नाही. त्याकरिता बऱ्याच बाबी पाहणे गरजेचे असते. विशेष म्हणजे जमिनीचे अक्षांश-रेखांश यांची फार महत्वाची भूमिका असतो.

 

     मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे कि,

किती जमीन मालकांना आपल्या जागेचे अचूक अक्षांश रेखांश माहिती आहेत किंवा तशी नोंद आपल्याकडे आहे?

     सध्याच्या आधुनिक जगात योजना आखणे व आराखडा बनवणे हे संगणकामार्फत लवकरात लवकर आणि अचूक पद्धतीने केले जाते, त्याकरिता विविध प्रकारच्या क्लिष्ट माहितीचे संकलन व विश्लेषण करण्याची आवश्यकता असते.  यांमध्ये नकाशेसुद्धा गरजेनुसार संगणकावर आणले जातात व पुढील प्रक्रिया राबवली जाते. हा झाला तांत्रिक मुद्दा.

     जर आपल्याकडे असे संगणकीकृत नकाशे सुयोग्य व अचूक अक्षांश-रेखांश सहित असतील तर त्याचे अनेक फायदे आणि लाभ आपल्याला मिळतात.

 

१.   स्वतःकडे हे डिजिटल नकाशे कधीही उपलब्ध असतात. जरी मूळ प्रिंट, हार्ड कॉपी किंवा कागदी प्रत म्हणूयात, ती समजा गहाळ झाली हरवली किंवा मिसप्लेस झाली तरी आपल्याकडे ओरिजिनल फाईल डिजिटल स्वरूपात पी.डी.एफ. स्वरूपात असल्याने केंव्हाही नक्कल अथवा प्रिंट काढता येते.

 

२.   ही प्रत डिजिटल असल्याकारणाने व्हाट्सअप, फेसबुक, ई-मेल किंवा डायरेक्ट पेनड्राईव्ह, सी.डी. द्वारे कधीही, कुठेही, केंव्हाही अगदी सहजपणे पाठवता येते.

 

३.   अचूक अक्षांश-रेखांश उपलब्ध असल्याने जागेचे अचूक मोजमाप दाखवता येते. गटबुक नकाशांशी सुसंगत व योग्य ताळमेळ जुळविल्यामुळे तंतोतंत (‘एक्झॅक्ट’) नकाशा तयार होतो.

 

४.    जर काही कारणाने सर्व संमतीने जमिनीचे हिस्से करायचे असल्यास किंवा आपला हिस्सा नेमकेपणे नकाशावर दाखवायचा झाल्यास पटकन दाखवता येतो. त्याकरिता संपूर्ण जागेचे जि.आय.एस. आणि  डी.जी.पी.एस. सर्व्हे मार्फत जमिनीचे अचूक मोजमाप करून आपल्याला जागेच्या हद्दी दर्शवून आपला हिस्सा अथवा जागेचा अपेक्षित भाग वेगळा पाहता येतो. नंतर त्याची हव्या त्या आकाराची प्रत (प्रिंट) घेता येऊ शकते. यामध्ये फायदा असा होतो की ही सर्व कामे चटकन होतात, समोरच सगळे नकाशे असल्याने कुरबुरींचा फारसा त्रागा होत नाही. आधी डिजिटल स्वरूपात संगणकावरच सर्व नकाशांचे एकत्रीकरण अथवा हिस्सेवारी केल्यावर, प्रत्येकी स्वतंत्र नकाशे अथवा एकत्रित असे विविध स्वरूपात आणि गरजेनुसार सर्वसहमतीने अधिकृत प्रत (प्रिंट) घेता येऊ शकते, नंतर प्रत्यक्ष जमिनीवर हद्दी निश्चित करणे केंव्हाहि उत्तमच.

 

५.   हे नकाशे डिजिटल स्वरूपात असल्याचा अजून एक महत्वाचा फायदा हा कि, जर विकास कामांचे प्रयोजन असल्यास विकासकाला त्वरित डिजिटल नकाशा उपलब्ध होतो, आणि पुढील रेखांकन-आरेखन (प्लॉटिंग-ले आऊटींग) वगैरे कामांसाठीचा अमुल्य वेळ वाचवता येतो. त्याचबरोबर आर्किटेक्टला अत्यावश्यक असलेला चतु:सीमा व इतर मोजमापांसहित सुयोग्य नकाशा त्वरित उपलब्ध होतो. त्याअधिक जागेच्या भौगोलिक उत्तर दिशेचे संज्ञान झाल्यामुळे अचूक रेखांकन करणे कैकपटीने सोप्पे होते.

 

६.   भौगोलिक उत्तर दिशेचे अचूक संज्ञान झाल्यामुळे जर कोणी वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवत असतील तर त्यांनाही ह्या तंतोतंत नकाशांचा अचूक वापर करता येतो.

 

७.   आपल्या जागेचे / वहिवाटीचे अद्यायावत डिजिटल नकाशे आपल्याकडे उपलब्ध असल्याकारणाने, जर एखादी सरकारी योजना किंवा आरक्षण किंवा रुंदीकरण आपल्या मालकीच्या क्षेत्रातून जात असल्यास, आपल्याला अशा योजने अंतर्गत येणारे स्वतःच्या मालकीचे क्षेत्रफळ नेमकेपणाने कळण्यास अनेक पट्टींनी मदत होते. त्याद्वारे मिळणारे लाभ सुद्धा नक्कीच पडताळून पाहता येतात. सरकारी योजनांच्या आखणीत सध्या जि.आय.एस. तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरले जाते, तेंव्हा जागेच्या संदर्भातील ताळमेळ जागामालकांच्या बाजूने देखील पाहता येतो.

 

८.   गमतीचा भाग असा की, जेंव्हा एखाद्या जागेची मोजणी अक्षांश-रेखांश यांच्या साहाय्याने केली जाते तेंव्हा त्या जागेच्या चतुःसीमांचे अक्षांश-रेखांश मिळतात. हे अक्षांश-रेखांश डी.जी.पी.एस. यंत्रणेद्वारे प्राप्त होतात. यामध्ये एखादे ठिकाण तंतोतंतपाणे स्थानबद्ध करण्यासाठी कमीतकमी १४ ते १७ (किंवा कधी-कधी निरभ्र आकाश असल्यास २४ पर्यन्त) जी.पी.एस. सॅटेलाइट यांची मदत घेतली जाते. (आपल्या भारत देशातर्फे 'गगन' ही दिशानिर्देशित करणारी उपग्रह प्रणाली आहे.) पुढे, अक्षांश-रेखांश संबंधित प्रणाली (Geographic Coordinate System) व प्रोजेक्शन सिस्टिम (Projection  System) यांच्या सुयोग्य वापराने व परस्पर ताळमेळ ठेवून संबंधित ठिकाणाचे स्थान पक्के केले जाते. हे स्थान इतके पक्के असते की, जमीन हलली, थोडी सरकली, काही निर्माण काम झाले, खड्डा आला, यामुळे हे अक्षांश-रेखांश तसूभरही देखील हलण्याचा प्रश्नच येत नाही. को-ओर्डीनेट सिस्टीम (Geographic Coordinate System) आणि प्रोजेक्शन सिस्टीम (Projection  System) ह्या भूगणितीय भूमापन पद्धतीचा एक भाग आहेत. त्याबद्दल अधिक खोलात गेल्यास वेगळ्या लेखाचं प्रबंध करावा लागेल. तात्पर्य असे की, अशा प्रकारे सर्वमान्य अचूक भूमापन पद्धतींची विश्वासार्हता खूप असते. (Geodetic’चा शब्दशः अर्थ भूगणितीय किंवा भूपृष्ठमितीय असाही आहे.) तेंव्हा आपल्या जागेचे पक्के स्थान पुढील काहीशे वर्षे तरी नक्कीच अबाधित राहते. कदाचित म्हणूनच असेल, तंतोतंत अचूकता आणि विश्वासार्हता यांमुळे जि.आय.एस. तंत्रज्ञानाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. असे अनेक महत्वाचे फायदे देखील आहेत.

 

९.   त्याचबरोबर आपल्या जागेच्या वापरासंबंधीची माहिती, वापराच्या क्षेत्रफळासहित आपल्याला तंतोतंत मांडता येते. अशी बरहुकूम माहिती नकाशा स्वरूपात उपलब्ध झाल्याने इतरही फायदे मिळण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते.

 

१०.   एक शेतीविषयक उदाहरण आहे, जेथे जि.आय.एस. तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे केला जातो. विशेषकरून बागायतदारांसाठी; जि.आय.एस. व जि.पी.एस. किंवा डी.जी.पी.एस. द्वारे तयार केलेले असे नकाशे उपयुक्त ठरू शकतात. जागा ताब्यात घेतल्या पासूनचे किंवा लागवडीपूर्व जि.आय.एस. नकाशे बनवून सर्वप्रथम या नकाशावर आपल्या जागेचा उतार, पोत, पोटखराबा, नाला, भूमिगत झरे, खडकाळ भाग, कातळ भाग इत्यादींचे बरहुकूम नकाशे तयार करता येतात. त्यानंतर मग बागेमध्ये लागवड कशी करायची, कोणत्या झाडांची लागवड कुठे करायची, झाडांचे पक्के स्थान ('लोकेशन') याचा प्रारूप आराखडा बांधता येतो. असा आराखडा कंप्युटरमध्ये डिजिटल त्रिमितीय (३डी) स्वरूपात सुद्धा बनवू शकतो. लागवडी खालील क्षेत्र व इतर क्षेत्र यांचा सुयोग्य ताळमेळ ठेवण्यास असे डिजिटल नकाशे खूप मार्गदर्शक ठरतात. काही बदल किंवा नवीन संकल्पना पटकन मांडता येते किंवा विविध प्रकारची झाडे बागेत असतील तर त्यांच्यामधील अंतरांनुसार अभ्यासपूर्वक मांडणी आधी कंप्युटरवर करून, मगच  नकाशाची प्रिंट काढू शकतो. आणि जागेचे विश्लेषण अथवा वर्गीकरण नकाशा स्वरूपात असल्याने इतर अनेक क्लिष्ट बाबींचे संज्ञान त्वरित होते. त्यामुळे आपले बहुमूल्य कष्ट, वेळ आणि खर्च या तीन महत्वाच्या गोष्टींची खूप बचत होते. लागवडी पश्चात झाडांची निगा व देखरेख हे सुद्धा डिजिटल नकाशाद्वारे शक्य होते. त्यासाठी ड्रोनची मदत होऊ शकते. हे ड्रोन्स अक्षांश-रेखांश द्वारे नियंत्रित होतात. त्यामुळे ठराविक ठिकाणाचं नेमकं वास्तव काही मिनिटांत आपल्या समोर येऊ शकते. मग आपण कोठेही असा, शेतात, घरी, कार्यालय, मॉल किंवा प्रवासात किंवा अगदी परदेशातून सुद्धा आपली लागवड, नकाशाची डिजिटल प्रत उपलब्ध झाल्यास किंवा आवश्यक संपर्क यंत्रणा उपलब्ध झाल्यास अगदी थेट बागेत देखील आपण पाहू शकतो. असे बहुपयोगी जि.आय.एस. तंत्रज्ञान बागायतदारांसाठी एक वरदानच आहे. सदर, हे एक उदाहरणादाखल आहे, अशा अनेकविविध व्यवहारोपयोगी उपायोजना जि.आय.एस. द्वारे अंमलात येऊ शकतात.

 

     असे बहुपयोगी जि.आय.एस. आणि डी.जी.पी.एस. तंत्रज्ञान, यांच्या संयुक्त आणि सुयोग्य वापराने आपण आपल्या बहुमोल जागेचे सर्वेक्षण करून डिजिटल नकाशा स्वरूपात आपल्याकडे जपून ठेवून, आपल्या आधुनिक व उज्वल भवितव्याची तजवीज करून ठेवावी. आपल्या परिसरातील ई-मोजणी करणारे प्रमाणित जि.आय.एस. तज्ञ आपल्याला ह्याबद्दल नक्कीच अधिक मार्गदर्शन करू शकतात.

 

     टीप : वरील माहिती ही केवळ आमच्यातर्फे केल्या जाणाऱ्या खासगी जमीन मोजणी वा सर्वेक्षण संदर्भातील आहे.

 

     अधिक माहितीकरिता कृपया आमच्याकडे संपर्क करावा…

 

     जाता-जाता आमच्याबद्दल थोडेसे...

 

     स्पॅशियन्स जिओ सोल्युशनस (Spatians Geo Solutions) ही एक अत्याधुनिक उपकरणांद्वारे जमीन मोजणी, भौगोलिक माहितीचे विश्लेषण, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नकाशे बनवणारी एक प्रोप्रयटरी संस्था आहे. त्यासाठीचे आवश्यक ज्ञान आणि तंत्रज्ञान गेल्या बारा वर्षांमध्ये मिळविलेले आहे. यांपैकी जमीन मोजणी हे व्यवसायाचे प्रमुख साधन आहे. कमीत कमी वेळात अचूकपणे जमीन मोजणी आणि भौगोलिक माहितीचे विश्लेषण यांसाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे आणि तंत्रज्ञान या संस्थेमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध आहे. त्यांचबरोबर, भौगोलिक माहिती प्रणालीचा वापरकरून अचूक विश्लेषण, संशोधन कार्य, भौगोलिक त्रिमितीय प्रतिकृती, रिमोट सेन्सिंगद्वारे माहितीचे विश्लेषण, ड्रोन सर्वेक्षण, आंतरजालपूरक (इंटरनेट) माहिती व नकाशे बनवणे, भौगोलिक माहिती प्रणालीचे प्रशिक्षण इत्यादींची सेवा दिली जाते.

 

अशिष कुरणे

संस्थापक, स्पॅशिअन्स जिओ सोल्युशन्स

चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र राज्य.

संपर्क: ९०७५४७५९२८.